मुंबई - दसऱ्याच्या मुहुर्तावर ग्राहक उत्साहात वाहन खरेदी करतात. मात्र, दसऱ्यालाही ग्राहकांना वाहन खरेदीसाठी फारसा उत्साह दाखविला नाही. गेल्या वर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत सुमारे ५० टक्के घसरण झाली आहे.
दसऱ्या दिवशी चांगली वाहन विक्री होईल, ही वाहन विक्रेत्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. शहरात वाहनांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. असे असले तरी यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावरही मोठ्या संख्येने नवी वाहने रस्त्यावर येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मागील दसऱ्याला ग्राहकांनी ५८४ वैयक्तिक वाहनांची खरेदी केली होती. ही संख्या घटून केवळ २९८ नवी वाहने शहरातील रस्त्यावर आल्याचे आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले. ग्राहकांकडून अपेक्षित वाहन खरेदी झाली नाही. त्यामुळे वाहन नोंदणीतून मिळणाऱ्या राज्य सरकारच्या महसुलात घट झाली आहे.
मुंबईतील ताडदेव, वडाळा आणि उपनगरातील अंधेरी, बोरीवली आरटीओत मिळून केवळ २९८ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी ५८४ वाहनांची नोंदणी झाली होती.
वाहन उद्योगात तीव्र मंदी-
चालू आर्थिक वर्षात वाहन उद्योग तीव्र मंदीमधून जात आहे. सर्वच वाहन उत्पादन कंपन्यांनी उत्पादनात घट केली आहे. सप्टेंबरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत २१ टक्के घट झाली होती. याशिवाय मारुती आणि टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीतही सप्टेंबरमध्ये घट झाली आहे. बॉश या वाहनांचे सुट्टे भाग करणाऱ्या कंपनीने चालू तिमाहीत एकूण ३० दिवस उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे (एम अँड एम) व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी वाहन उद्योगात सुधारणा होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले होते. दसरा-दिवाळी हे सण उद्योगासाठी निर्णायक ठरणार असल्याचेही गोयंका यांनी म्हटले होते.