मुंबई - सरकार जी भूमिका घेते तीच भूमिका महिला आयोग घेते, याचाच अर्थ महिलांच्या प्रश्नांवर राज्य महिला आयोग गंभीर नाही. यासाठी राज्य महिला आयोगाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली. आज (सोमवारी) संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या वतीने सरचिटणीस मरियम ढवळे यांनी ही भूमिका मांडली.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राष्टीय अधिवेशन 27 ते 30 डिसेंबर दरम्यान होत आहे. हे अधिवेशन भायखळा येथील साबू सिद्दिक पॉलिटेक्निक हॉलमध्ये होणार आहे. या अधिवेशनाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर करणार आहे. तसेच यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस ढवळे यांनी दिली.
हेही वाचा - काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, तरुणांना सर्वाधिक संधी मिळण्याची शक्यता
माजी खासदार वृंदा करात या उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतील. राज्यभरातील २० हजार महिला या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. यात महिलांवर होणाऱ्या लैगिक अत्याचार, रोजगार, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार, कुपोषण, दलित, आदिवासी महिलांवर होणारे अत्याचार याविषयी चर्चा होणार आहे.