मुंबई - एखादी मौल्यवान वस्तू चोरीला गेली तर ती परत मिळेलच याची शाश्वती नसते. परंतू, तब्बल 33 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोन्याची चैन जर परत मिळाली तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 1986 साली मंदिरात जात असताना तक्रारदार दिलीप शाह यांच्या आईची सोन्याची चैन चोरीला गेली होती. मंगळवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल मुंबई रेल्वे पोलिसांकडून तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात घाटकोपर येथील 104 तक्रारदारांना चोरीला गेलेल्या वस्तू परत करण्यात आल्या. यामध्ये 2 किलो 282 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तुंचा समावेश आहे.
हेही वाचा - देशातील समुद्रावरील सर्वात लांब 'पारबंदर प्रकल्प', मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल रेल्वेला ओळखले जाते. या लोकल रेल्वेने दररोज 80 लाखांपेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पर्स चोरी होण्याचे प्रमाण अधिक असते. अशा प्रकरणांचा पोलीस तपास करून अटक केलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करतात. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तक्रारदारांना हा मुद्देमाल परत करण्यात येतो.
हेही वाचा - लंडनच्या धर्तीवर मुंबईत होणार 'मुंबई आय', आकाशातून दिसणार संपूर्ण शहर
बुधवारी घाटकोपरच्या रेल्वे लोहमार्ग पोलीस दलाच्या कवायत मैदानावर एका कार्यक्रमांमध्ये 104 फिर्यादीचे 1 कोटी 5 लाख 24 हजार 907 रुपये किमतीचा मुद्देमाल परत देण्यात आला. यात 2 किलो 282 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदी 91 ग्रॅम किंमत अंदाजे 21000, 5 लॅपटॉप किंमत अंदाजे 1 लाख 93 हजार 600, रोख रक्कम 1 लाख 2 हजार दोनशे रुपये, कॅमेरा अंदाजे किंमत 1 लाख हजार 150 यांचा समावेश आहे. असून या कार्यक्रमात बोलताना मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर म्हणाले, की दिवाळीला शंभर तक्रारदारांच्या वस्तू परत केल्या आणि मकर संक्रातीला शंभरपेक्षा अधिक जणांच्या वस्तू परत केल्या आहेत. येणाऱ्या पाडव्याला यामध्ये अजून जास्तीत जास्त तक्रारदारांच्या वस्तू परत करून आम्ही आमच्या कामाचे वैशिष्ट्ये दाखवून देऊ, असे ते म्हणाले.