मुंबई - कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. अशात लॉकडाऊनदरम्यान आपला जीव धोक्यात टाकून पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. या परिस्थितीत अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज मुंबईतील 52 वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ते कोरोनाबाधित झाले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन दिली आहे. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्र पोलीस खात्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. याआधी शनिवारी 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
नुकताच मृत्यू झालेले पोलीस कॉन्स्टेबल पश्चिमी उपनगरातील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते दक्षिण मुंबईतील वरळी नाका भागात राहात होते. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात शनिवारपर्यंत 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 15 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.