मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रस्त्यावर गर्दी जमू नये म्हणून, मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. संचार बंदीचे आदेश लागू असतानासुद्धा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ज्याच्या अंतर्गत 20 मार्च ते 26 मार्च या कालावधीत तब्बल 220 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबईतील दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर मुंबई अशा ठिकाणी मिळून ही कारवाई करण्यात आलेली आहे.
कोरोना रुग्ण संदर्भात 2 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे तर विनापरवाना हॉटेल सुरू ठेवणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विनापरवाना इतर दुकाने सुरू ठेवण्याच्या 39 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याच्या 116 प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, अत्यावश्यक सेवा या 24 तास सुरू राहतील, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवेबाबत स्पष्ट आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.