मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून केंद्र सरकारने लॉकडाऊनचा काळ १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अडकलेले परप्रांतीय कामगार, तिर्थयात्री तसेच विद्यार्थी त्यांच्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या संदर्भात राज्य शासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
परप्रांतीयांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या प्रक्रियेसाठी मुंबईतील प्रत्येक प्रभागात एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भात मदत केली जात आहे. घरी परतू इच्छित नागरिकांनी त्यांचा सर्व तपशील पोलिसांना द्यावे. या संदर्भात एक अर्ज करावा. अशा सुचना करण्यात येत आहेत.
समूहांमध्ये प्रवास करणार्या नागरिकांना त्यांच्या वतीने दोन गट प्रमुखांची नावे या वेळेस द्यावी लागणार आहेत. याबरोबरच समूहामध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, प्रवास कुठे करायचा आहे? याबद्दलच्या संपूर्ण माहितीसह रजिस्टर डॉक्टरांकडून देण्यात आलेले मेडिकल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे.
पोलीस ठाण्यात सादर केलेल्या माहितीची शहानिशा पोलिसांकडून करण्यात आल्यानंतरच संबंधित नागरिकाला राज्याबाहेर प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, कुठलीही परवानगी नसताना कोणालाही राज्याबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच परप्रांतीय नागरिकांनी विनाकारण रेल्वे स्थानकांवर परवानगी शिवाय गर्दी करु नये, अशा सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात येत आहेत.
हेही वाचा - Coronavirus : पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांना 'बेस्ट'चा आधार
हेही वाचा - अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याच कार्यक्रम सरकार करतयं - फडणवीस