मुंबई - पोलीस म्हटले, की जनमानसात त्याची वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर येते. नागरिकांना पोलिसांकडे पाहून आपण सुरक्षित असल्याची भावना येते. तर गुन्हेगार पोलिसांना पाहून भयभीत होतो. सध्या कोरोनाच्या काळात फ्रन्ट फुटवर पोलीस कोरोनाचा सामना करत आहेत. नागरिकांनी घरात रहावे, सुरक्षित राहावे म्हणून आव्हान करीत आहेत. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना पोलिसही कोरोना संक्रमणाचे शिकार होत आहेत. पण अशा परिस्थितीत मुंबई पोलीस दलातही काही पोलीस हे स्वतः पुढे येऊन पोलिसांवरील दडपण वेगवेगळ्या माध्यमातून कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल संजीव लांडगे.
मुंबई पोलिसांच्या खेरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल संजीव लांडगे यांनी लॉकडाऊन काळात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांवर 'गो कोरोना' नावाचे गाणे तयार केले आहे. सध्या पोलीस दलात या गाण्याची मोठी चर्चा आहे. कोरोनाच्या लढ्यात सध्या डॉक्टर, नर्स, पोलीस, व इतर वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनाच्या लढ्यातील या योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या गाण्याची कल्पना संजीव यांना सुचली. त्यांच्या या गाण्याला मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेता विजय पाटकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गुणाजी यांनी सुद्धा साथ दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ७२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात ५ पोलीस अधिकारी तर ६७ पोलीस कर्मचारी आहेत. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही १ हजार १३६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात १२८ पोलीस अधिकारी व १ हजार ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...