मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजारात हॅन्ड सॅनिटायझरची मागणी वाढलेली आहे. अशातच साठेबाजांनी हॅन्ड सॅनिटायझरची साठेबाजी करून चढ्या भावाने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 11ने या विरोधात कारवाई सुरू केली आहे. आज पोलिसांनी तब्बल 27 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 50 मिलीच्या 420 बाटल्या , 100 मिलीच्या 2 हजार 800 बाटल्यांसह 1 लाख 51 हजार मास्क जप्त करत 5 जणांना अटक केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजारात मास्क व हॅन्ड सॅनिटायझरचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारकडून 13 मार्च रोजी मास्क व हॅन्ड सॅनिटायजर या अत्यावशक वस्तू असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर मास्क व हॅन्ड सॅनिटायझर हे ठरलेल्या भावात विकण्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली. मात्र असे असतानासुद्धा मुंबईतील धारावी परिसरात कुठलाही परवाना नसताना हॅन्ड सॅनिटायझर व मास्कचा मोठ्या प्रमाणात साठा करून त्याची चढ्या भावात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी क्राईम ब्रँच युनिट 11ने धारावी परिसरातील 3 गोडाऊनवर धाड मारीत 22 लाख 74 हजारांचा तब्बल 1 लाख 51 हजार 600 मास्कचा साठा जप्त केला आहे.
अटक केलेल्या आरोपींनी गोडाऊनमध्ये vigour health care कंपनीचा 4 लाख 51 हजार रुपयांचा हॅन्ड सॅनिटायझरचा साठा केला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही टोळी विनापरवाना हॅन्ड सॅनिटायझर व मास्कची विक्री चढ्या भावाने करीत होती. अटक करण्यात आलेले आरोपी आदर्श हरिशचंद्र मिश्रा (21), शुभम किशोर तिवारी (23), अश्रफ जमाल शेख (50), अख्तर हुसेन मोहरम हुसेन फारुकी (49) युसूफ जैनुल अन्सारी यांना न्यायालयाने 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.