मुंबई- महाराष्ट्र पोलिसांनी सरकारला लक्ष्य केल्याच्या आरोपाखाली एका आठवड्यात दोन वेगवेगळ्या रॅपर्सवर गुन्हे दाखल केले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्याने तक्रारीवरून रॅपर उमेश खाडेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खाडे यांनी हे गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शंभो नावाच्या अकाऊंटवर अपलोड केले होते. ते गाणे व्हायरल झाले होते.
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान), ५०५(२) (वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्भावना निर्माण करणे किंवा प्रोत्साहन देणे) आणि कलम ६७ (प्रकाशन किंवा प्रसारित करणे) अंतर्गत खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर जाण्याची परवानगी देण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आक्षेपार्ह नसल्याचा आव्हाड यांचा दावा शुक्रवारी एफआयआर नोंदवल्यानंतर, खाडे याला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तपास अधिकार्यासमोर हजर राहण्यास सांगणारी नोटीस बजावण्यात आली. रॅपरला अटक करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून खाडेच्या गाण्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले होते.
यापूर्वी रॅपर मुंगसे अडचणीत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पोलिसांनी बुधवारी रॅपर राज मुंगसे विरुद्ध त्याच्या गाण्याबद्दल गुन्हा दाखल केला ज्याने महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारला कोणाचेही नाव न घेता अपमानास्पद भाषा वापरून लक्ष्य केले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. रॅपर मुंगसेने तयार केलेल्या गाण्यात त्याने अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे गटावर टीका केली होती. पन्नास खोके एकदम ओके, या वादग्रस्त शब्दांचा वापर केला होता. खोके या शब्दावरून अनेकदा ठाकरे गटाने शिंदे गटावर तक्रार केली होती. मागील पाच दिवसात मुंगसेच्या रॅपला लाखो लोकांनी पाहिले आहे. ठाणे येथील एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी राज मुंगसेबाबत तक्रार दिल्यावर अंबरनाथ पोलिसांनी त्याला अटक केल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता कारवाई केली. हा रॅपर छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव येथे राहणारा असल्याची माहिती समोर आलेली आहे.