मुंबई - समाज माध्यमांवर दररोज काहीतरी बेकायदेशीर बाबी घडत आहेत. सायबर गुन्हे हा समाजापुढचा मोठा प्रश्न उभा आहे. "सध्या सायबर गुन्हेगारीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, येत्या काळात सध्याच्या परिस्थितीपेक्षा ५० टक्क्यांहून जास्त गुन्हे वाढ होणार असल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघाने आज (शनिवार) आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईकरांच्या अनेक समस्यांचे निराकरण करून त्यांची रोखठोक उत्तरे बर्वे यांनी वार्तालाप कार्यक्रमात दिली. मुंबईत सायबर क्राईमचे वाढते प्रमाण, पोलीस दलात राबवण्यात आलेली अंबिस प्रणाली, पोलिसांविषयी असणारे समज गैरसमज अश्या अनेक विषयांवर बर्वे यांनी भाष्य केले. येत्या काळात सद्यपरिस्थितीपेक्षा ५० टक्के अधिक सायबर गुन्हे वाढणार असून त्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. असे केले तर कदाचित अशा परिस्थितीवर आळा घालता येईल असे बर्वे म्हणाले. मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत हक्काची घर असावीत यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकार या निर्णयाला सकारात्मक असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचा मानस असल्याचे यावेळी बर्वे म्हणाले. मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, उपाध्यक्ष सुधाकर कश्यप उपस्थित होते.