मुंबई - ओएलएक्सवर या संकेतस्थळावर गाड्या विकण्याबाबात जाहिरात देऊन ते वाहन दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश पद्मनाभन इसिकी तेवर (वय 19 वर्षे) व फुलपंडी मरुगण (वय 19 वर्षे, दोघे रा. तमिळनाडू), अशी अटक करण्यात आरोपींचे नाव असून त्यांना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी तमिळनाडू राज्यातून अटक केली आहे.
लुटी प्रकरणी वडाळा आरटीओ येथील खासगी एजंट जहांगीर युनूस शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ओएलएक्सवर या संकेतस्थळावर एक दुचाकी विकण्याबाबतची जाहिरात आरोपींनी दिली होती. त्यावरून शेख हे दुचाकी खरेदी करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यावरून दुचाकी पाहून व्यवहार करण्यासाठी कोकरी आगार, म्हाडा चाळीजवळ शेख यांना आरोपींनी बोलावले. शेख गाडी पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता, तेथे चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची 50 हजार किंमतीची सोन्याची चैन पळवली. याबाबत टिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्यात आली. यातील काही आरोपी तमिळनाडू येथे पळून गेल्याचे पोलीस तपासात समजल्यानंतर एका विशेष पथकाने तमिळनाडू येथून दोन आरोपींना अटक केली तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या आदेशाची बनवली बनावट प्रत