मुंबई : महिला तक्रारदार विद्यार्थिनी माटुंगा परिसरात राहते. तिला तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका युजर आयडीवरून क्रिप्टो करन्सीबाबत एका कंपनीच्या नावे जाहिरातीचा मॅसेज आला. याद्वारे आरोपीने तक्रारदार विद्यार्थिनीला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास तिला दुप्पट रक्कम परत मिळणार असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यासाठी त्याने आपल्या मोबाईलद्वारेही तिच्याशी संपर्क साधला होता.
काय आहे प्रकरण? : आरोपीने विद्यार्थीनीची क्यु.आर. कोडच्या माध्यमातून एकुण 23 हजार 996 रुपयांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने माटुंगा पोलीस स्टेशन गाठले. तिच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 419, 420, 465, 467, 471आणि कलम 66 सी, 66 डी आय टी ॲक्ट अन्वये माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर माटुंगा पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीच्या इंस्टाग्राम खात्याची व क्यु आर कोड वरून बँक खाते धारक यांच्याशी झालेल्या व्यवहाराची तांत्रिक माहिती घेण्यात आली. यातील आरोपीचा साऊथ 24 परगनाज, पश्चिम बंगाल येथे माग काढण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेवून पोलीस निरीक्षक वाघ हे पश्चिम बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी आपली पथके तयार करून साऊथ 24 परगनाज जिल्ह्याच्या, मेटीयाबुर्ज व महेशटाला या आरोपींचा सूळसुळाट असलेल्या संवेदनशील परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने रेकी केली.
आरोपीला अटक : मुंबई पोलिसांनी आरोपीची खात्रीशीर माहिती काढून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने छापा टाकला. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. फसवणुकीच्या उद्देशाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून खाते सुरू करणारा आणि पीडितेशी मोबाईल फोनवर बोलणारा मुख्य सूत्रधार आणि मोबाईल क्रमांक धारक आरोपी सैदुल अली मौला, वय 24 वर्ष याला जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पश्चिम बंगालच्या अलिपूर सदर न्यायालयासमोर हजर करून ट्रांजिस्ट रिमांडवर माटुंगा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पुढील तपासादरम्यान विद्यार्थीनीची फसवणुकी दरम्यान गमावलेली 23 हजार 996 रुपये रक्कम परत मिळवण्यात आली आहे.
एका दगडात दोन पक्षी मारले : आरोपीला मुंबईतील न्यायालयात हजर केले असता त्याला 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी एकीकडे आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला आणले आहे. तर दुसरीकडे त्याच टीमने गेल्या वर्षी आयफोन चोरल्याप्रकरणी गुन्ह्याचाही छडा लावला. पोलिसांनी कोलकात्यापासून सुमारे 180 कि.मी. अंतरावरील बिरभुम जिल्ह्यातील मुराराई परिसरातून तक्रारदाराचा 50 हजार रुपयांचा आयफोन परत मिळवला आहे. आरोपीची कुठलीही ठोस माहिती नसताना सायबर गुन्हा शाखेने उत्कृष्ट तपास करत पश्चिम बंगालमधून आरोपीला अटक केली आणि चोरीची रक्कम जप्त केली. या कामगिरी बद्दल पोलीस उप आयुक्त डॉ प्रवीण मुंढे यांनी माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केशव वाघ यांच्यासह त्यांच्या टीमचे प्रशस्तीपत्र देवून गौरव केला आहे.
हेही वाचा : Nagpur Crime News: स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला दुहेरी जन्मठेप