मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील महिन्यात दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. बुधवारी नवे ३ रुग्ण आढळून आले असून ६२ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे धारावीही कोरोनामुक्ती कडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
धारावीत ६२ ऍक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात ७ ते ११ हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत ८ मार्चला १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. ११ एप्रिलला धारावीत ७६ नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात १ मे ला २८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. १०, ११, १३, २२ मे ला दिवसाला ९ रुग्णांची नोंद झाली आहे. २५ मे ला ७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी ३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या ६७९८ वर गेली आहे. त्यापैकी ६३८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत १ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. २४ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी, २ फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत ७ लाख कोरोना रुग्ण -
मुंबईत ७ लाख १ हजार २६६ कोरोनाचे एकूण रुग्ण आहेत. त्यापैकी १४ हजार ७४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ५६ हजार ४४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या २७ हजार ९४३ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३४८ दिवस इतका आहे.
हेही वाचा - नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश