मुंबई - शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणादरम्यान कोणावरही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले नव्हते. मात्र 8 मार्चला एका 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी येथील खासगी रुग्णालयात घडली. लसीकरणानंतर या ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणी महापालिकेने तातडीने समिती गठीत केली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मांगला गोमारे यांनी दिली.
लसीकरणामुळे वृद्धाचा मृत्यू नाही -
8 मार्चला दुपारी अंधेरी येथील खासगी रुग्णालयात एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला लस टोचण्यात आली. लस टोचल्यावर त्या व्यक्तीला चक्कर आली. त्या व्यक्तीला दुपारी 3.50 च्या सुमारास आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल केले असता सायंकाळी 5 वाजता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला हृदयविकाराचा आजार होता. या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यावर त्याच्या अहवालावरून मृत्यूचे नेमके कारण समजू शकते असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले होते. लसीकरणानंतर घडणाऱ्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक समिती गठीती केली होती. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या समितीने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा अहवाल दिला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
लसीकरणादरम्यान जाणवणारे दुष्परिणाम -
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्याचे पालिका प्रयत्न करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान कोणावरही मोठे दुष्परिणाम झाले नसल्याचे दिसून आले. लस घेतल्यावर ताप येणे, लस दिलेला हात दुखणे असे प्रकार समोर आले. हे सर्व सौम्य दुष्परिणाम आहेत. लसीकरणानंतर ताप येणे ही सामान्य बाब आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आतापर्यंतचे लसीकरण -
मुंबईत काल (दि. 17 मार्च) पर्यंत एकूण 7 लाख 28 हजार 613 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 6 लाख 36 हजार 321 लाभार्थ्यांना पहिला तर 92 हजार 292 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 6 हजार 582 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 48 हजार 468 फ्रंटलाईन वर्कर, 3 लाख 28 हजार 168 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 45 हजार 395 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2 लाख 6 हजार 582
फ्रंटलाईन वर्कर - 1 लाख 48 हजार 468
ज्येष्ठ नागरिक - 3 लाख 28 हजार 168
45 ते 59 वय - 45 हजार 395
एकूण - 7 लाख 28 हजार 613
हेही वाचा - मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येचा चढता आलेख; बुधवारी 2377 नवे रुग्ण