मुंबई - उत्तर लोकसभेसाठी मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून एकूण 60 टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे. त्यामुळे वाढलेले मतदान हे प्रस्थापित सरकार विरोधात असते असा समज आहे. मात्र, भाजप व गोपाळ शेट्टी यांनी 2014 पेक्षा अधिक मताने यंदा विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. राज ठाकरे यांच्या सभेचा परिणाम आणि काँग्रेसने केलेला प्रचार पाहता निवडूण कोण येणार, हे ठामपणे सांगणे कठीण आहे.
काँग्रेसने बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर करुन भापजच्या गोपाळ शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे केले. या निवडणूकीत एकीकडे ग्लॅमर फेस म्हणून उर्मिला मातोंडकर तर दुसरीकडे संघटनात्मक बांधणी असलेले गोपाळ शेट्टी अशी लढत होत आहे. यामुळे देखील उत्तर मुंबईत मतदानाचा टक्का वाढलेला असण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत.
नगरसेवक, आमदार ते खासदार असा बोरिवली विधानासभेतून गोपाळ शेट्टी यांनी प्रवास केला. उर्मिला यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेट्टी यांना सोपा पेपर असल्याचे वर्तवले जात होते. मात्र, उर्मिला यांनी धडाक्याने प्रचार केला. त्यामुळे शेट्टी यांच्या समोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे.
राज फॅक्टर शेट्टीसाठी डोकेदुखी ठरणार -
उत्तर मुंबईमध्ये राजच्या मनसेला माननारा वर्ग लक्षणीय आहे. राज यांनी सभांचा धडाका लावत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेतून बाहेर काढण्याची हाक दिली आहे. या मतदारसंघात महाआघाडीसह 'मनसे' कार्यकर्त्यांनी 'दिलसे' काम केले आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या अस्तित्वाला सुरूंग लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
नवखी उर्मिलाला शेट्टी देणार शह -
काँग्रेसने अचानक अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर करुन अनेकांना धक्का दिला. कारण उर्मिला या नवख्या उमेदवार तर त्यांच्यासमोर दिग्गज तसेच विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान होते. शेट्टी यांचा मतदारसंघातील संपर्क दांडगा आहे. त्यामुळे उर्मिलाला शेट्टी शह देणार असे बोलले जात आहे.