मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील बंधपत्रित निवासी डॉक्टरांची मुदत अखेर तीन महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ अपुरे पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, या तीन महिन्यांसाठी बंधपत्रित डॉक्टरांना 1 लाख 31 हजार रुपये इतका पगार देण्यात येणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज(बुधवार) जारी करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात मुंबईत अंदाजे 350 बंधपत्रित निवासी डॉक्टर पालिका रुग्णालयात सेवा देत होते. तर, या डॉक्टरांची मुदत 30 जुलैला संपली आहे. पण मुंबईत अजूनही कोरोनाचे संकट काही संपलेले नाही. अशावेळी मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी या डॉक्टरांची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण याला या डॉक्टरांनी विरोध केला. त्यानंतर मात्र पगार वाढ करण्याची मागणी करत तीन महिने सेवा करण्याची तयारी बंधपत्रित डॉक्टरांनी दाखवली. त्यानुसार 1 लाख 70 हजार रुपये पगारवाढीची मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बाँडेड रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेने केली.
पालिकेने अखेर आज एक परिपत्रक काढत या डॉक्टरांची तीन महिने मुदत वाढवली आहे. तर त्यांची 1 लाख 70 हजाराची मागणी मान्य झाली नसली तरी त्यांना मोठी पगार वाढ दिली आहे. 1 लाख 31 हजार अशी पगारवाढ करण्यात आली असून 30 ऑक्टोबरपर्यंत बॉण्ड कायम राहील अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विशाल राख यांनी दिली आहे. दरम्यान अंदाजे 100 बंधपत्रित डॉक्टरांना पुढील शिक्षणासाठी बंधपत्र मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता सुमारे 250 बंधपत्रित डॉक्टर कोरोना काळात पालिका रुग्णालयात 30 ऑक्टोबरपर्यंत सेवा देणार आहेत, असेही डॉ. राख यांनी सांगितले आहे.