मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. लसीकरण तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी नगरसेवकांच्या विभागात आणि खासगी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी राजकीय बॅनरबाजी केली जाते. बॅनरबाजी करू नये, असे सांगूनही केली जात असल्याने पालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजी
मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी करावा यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. सुरुवातीला पालिका सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये अशा ठिकाणी लसीकरण केले जात होते. मात्र लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने मुंबईमधील 227 नगरसेवकांच्या प्रभागामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मुंबईमधील नगरसेवक हे विविध राजकीय पक्षाशी संलग्न असल्याने त्यांनी आपली व पक्षाची जाहिरात करणारे फलक केंद्रावर लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही खासगी लसीकरण केंद्रांवरही बॅनरबाजी केली जात आहे.
पालिकेची कारवाई सुरू
पालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी बॅनर्स होर्डिंग्स व पोस्टर्स झळकवण्यास मनाई केली आहे. मात्र, तरीही या नियमाचे उल्लंघन करून बॅनरबाजी केली जाते आहे. मंगळवारी (दि. 15 जून) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विलेपार्ले येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्याठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. सोमवारीच (दि. 16 जून) पालिका आयुक्तांनी बॅनरबाजी केल्यास कारवाई करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज दुसऱ्याचा दिवशी बॅनरबाजी केल्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर आपण विविध माध्यमातून लस उपलबध करून देता आहोत. लसीकरण केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याच कोणी भांडवल करू नये यासाठी बॅनरबाजी करू नसे, असे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही बॅनरबाजी केली जात असल्याने त्या विरोधात कारवाई सुरू केली असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.