मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ( Mumbai Municipal Elections ) फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र त्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यातच निवडणुका २३६ कि २२७ प्रभागानुसार घायच्या याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग संख्येबाबत उच्च न्यायालयात दाद मागावी असे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत. यामुळे काही दिवसात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. याचिकेवर निकाल आल्यावर निवडणुका जाहीर होतील. यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ( Mumbai Municipal Elections ) पुढील वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्येच होण्याची शक्यता आहे.
पालिका बरखास्त - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. महापौर पदाची निवडणूक ९ मार्च रोजी झाली. यानुसार पालिकेचा ५ वर्षाचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ मध्ये संपला. पालिकेचा कार्यकाळ संपताना निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे निवडणूक झालेली नाही. राज्य सरकारने कार्यकाळ संपल्याने पालिका बरखास्त करून पालिका आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. प्रशासकांचा कार्यकाळ सहा महिने असल्याने त्याआधी निवडणूक घेतली जाईल अशी अपेक्षा सर्व राजकीय पक्षांना होती.
प्रभागांची संख्या बदलली - मुंबई महापालिकेचे २२७ प्रभाग होते. त्यामध्ये ९ प्रभाग वाढवून २३६ करण्यात आले. २३६ प्रभागांना राज्य सरकारने मान्यता दिली. प्रभाग संख्या वाढवण्यात आल्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली असता याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. शिंदे यांच्या सरकारने २३६ प्रभाग रद्द करून पुन्हा २२७ प्रभाग केले. शिंदे सरकारच्या या निर्णयाला मुंबई महापालिकेतील माजी महापौर सुहास वाडकर यांनी आव्हान दिले आहे.
लवकरच उच्च न्यायालयात याचिका - पालिकेने २३६ प्रभागानुसार अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी तसेच महिला प्रभाग आरक्षण जाहीर केले आहेत. २३६ प्रभागानुसार पालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार याद्या तयार केल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारने प्रभागांची संख्या कमी करून २२७ केले आहेत. यामुळे पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. तसेच मतदार याद्या तयार कराव्या लागणार आहेत. यासाठी २२७ प्रभागांचा निर्णय रद्द करावा अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयात दाद मागावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे वाडकर यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूका - मुंबई महानगरपालिकेने २३६ प्रभागानुसार निवडणुकीची तयारी केली आहे. अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी तसेच महिला प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. २३६ प्रभागांनुसार मतदार याद्या बनवण्यात आल्या आहेत. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल होणार आहे. याचिकेवर नोव्हेंबरमध्ये सुनावणी होऊ शकते. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये निकाल लागून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. यामुळे पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणुका जाहीर होतील.