मुंबई - शहरात मोकळ्या जागेवर महापालिकेकडून उद्याने उभारली जातात. मात्र, त्यात अनेक त्रुटी असतात. याबाबत नगरसेवकांनीही वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेत पालिका प्रशासनाने उद्यानांबाबत नवे धोरण बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्याने आणि मैदानांबाबत मुंबईकरांना काय वाटते, कोणत्या सुविधा महत्त्वाच्या वाटतात याबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुंबईकरांनी आपल्या सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. नवे धोरण आखताना यातील महत्त्वाच्या सूचनांचा विचार केला जाणार असल्याचे उद्यान विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई महापालिकेची शहरात सुमारे १ हजार ६८ उद्याने आणि मैदाने आहेत. या सुविधांचा वापर नागरिकांद्वारे मोठ्या प्रमाणात नियमितपणे केला जातो. उद्यानांची व मैदानांची देखभाल स्वयंसेवी संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यादृष्टीने नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या स्तरावर सुरु आहे. धोरणाचा प्राथमिक मसुदा अधिकाधिक लोकाभिमुख पद्धतीने व सर्वसमावेशक असावा, यासाठी नागरिकांच्या सूचना आणि अभिप्राय आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
उद्याने आणि मैदानांच्या देखभालीसाठी महापालिकेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या धोरणाचा प्राथमिक मसुदा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जाईल. आतापर्यंत २५० सूचना आल्या असून मुंबईकरांनी १८ ऑगस्टपूर्वी अधिक सूचना पाठवाव्यात असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे.