मुंबई - जगभरात हजारो बळी घेणाऱ्या 'कोरोना' व्हायरसचा मुंबईमध्ये एकही रुग्ण नाही. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. मुंबई महापालिका कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड सुरू असून या रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. भारतात कोरोनाच्या चाचण्या करणारी पुणेनंतर ही दुसरी प्रयोगशाळा असल्याच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. गरज भासल्यास मुंबईमध्ये आणखी ४ रुग्णालयात विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी पालिकेने तयारी ठेवली आहे, असेही काकाणी म्हणाले.
जीवघेण्या 'कोरोना' व्हायरसने चीन-हाँगकाँगसह काही देशात धुमाकूळ घातल्यामुळे मुंबईतील विमानतळावर राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातूनही परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये 'कोरोना' व्हायरसची लागण झाल्याचा संशय असलेले ४०० रुग्ण निदर्शनास आले. त्यापैकी ६२ रुग्णांना पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ताच्या चाचणी अहवालातून त्यापैकी एकाही रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार त्यांना १४ दिवस रुग्णालयात विलिगीकरण वॉर्डमध्ये उपचार केल्यावर घरी सोडण्यात आले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संशयित ४०० रुग्णांपैकी ३७६ रुग्णांशी दूरध्वनीद्वारे संपर्क ठेवण्यात पालिकेला यश आल्याचे काकाणी यांनी सांगितले.
चाचणी करणारी भारतातील दुसरी अद्ययावत प्रयोगशाळा -
मुंबई विमानतळावर कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण निदर्शनास आल्यास त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. त्याठिकाणी त्याच्या रक्ताचे नमूने घेऊन पुणे येथील नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या ठिकाणी पाठवण्यात येते होते. या ठिकाणी रक्ताचे नमुने पाठवल्यावर २ ते ३ दिवसात रिपोर्ट मिळत होते. रक्ताच्या चाचणीचा रिपोर्ट लवकर मिळावा म्हणून पालिकेने कस्तुरबा रुग्णालयातच प्रयोगशाळा अद्ययावत केली आहे. अद्ययावत केलेल्या प्रयोगशाळेत मोठ्या यंत्राच्या सहाय्याने एकाच वेळी ९० तर, लहान यंत्राच्या सहाय्याने एकाचवेळी २४ जणांच्या रक्त चाचण्या करता येऊ शकतात. या अद्ययावत प्रयोगशाळेत ५ ते ६ तासात चाचणीचे रिपोर्ट मिळत आहेत. ओपीडीमध्ये रुग्णसंख्या वाढली तरी या प्रयोगशाळेमुळे काही तासातच चाचणीचे रिपोर्ट मिळणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे काकानी यांनी सांगितले.
पालिकेचे ४ तर खासगी रुग्णालये सज्ज ठेवणार -
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णलयात विलिगीकरणाचे २८ बेड कार्यरत आहेत. कोरोनाचा धोका वाढल्यास या रुग्णालयात आणखी १०० बेडची व्यवस्था केली जाईल. कोरोनाचा धोका वाढल्यास उपनगरात घाटकोपर येथील राजवाडी, वांद्रे व कुर्ला येथील भाभा तसेच जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात आणखी ५० ते १०० विलिगीकरणाचे बेड सुरु करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. गरज पडल्यास खासगी रुग्णालयांमध्येही विलिगीकरण बेडची व्यवस्था करण्याची पालिकेने तयारी ठेवली असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
अशी घ्या कोरोनाची काळजी -
ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असे आजार वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. या आजारात श्वसनालाही त्रास होतो. न्युमोनियासारख्या या आजारात मूत्रपिंडही निकामी होऊ शकते. त्यामुळे ५ दिवसांहून अधिक काळ हे आजार बरे न झाल्यास त्या रुग्णाला त्वरित पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून नागरिक एन ९५ मास्क विकत घेण्याच्या मागे लागतात. मात्र, या मास्कचा वापर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनाच होतो. यामुळे नागरिकांनी खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा, तो हात रुमाल दर ३ ते ४ तासाने बदलावा. दिवसभरात काही वेळाने सातत्याने हात साबणाने २० सेकंद घासून धुवावेत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, कोरोनाची लागण झाली असल्यास त्वरित कस्तुरबा रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणूमुळे जनतेने घाबरून जाऊ नये - राजेश टोपे