मुंबई: मुंबईत मागील काही दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून मुंबईतील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याने वाहनांचं मोठं नुकसान तर होतच आहे. परंतु वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. पावसामुळे उन्मळून पडणारी झाडं, रस्त्यावर तुंबणारे पाणी, अति पावसामुळे रस्त्याला येणारे नदीचे रुप, यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी ट्रॅफिक समस्या, या सर्वांतून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मुंबई मेट्रोने अतिरिक्त सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. मुसळधार पावसामध्येसुद्धा मुंबई मेट्रोचे विना व्यतय सेवा सुरू राहील याची सर्वतोपरी काळजी सुद्धा मुंबई मेट्रो कडून या आधीच घेण्यात आली आहे.
दैनंदिन प्रवासाची संख्या २ लाखाच्या पार: विशेष म्हणजे नागरिकांसाठी महा मुंबई मेट्रोने मान्सून कंट्रोल रूम देखील सुरू केली असून प्रत्येक मेट्रो स्थानकावर लावलेले ६४ कॅमेरे प्रत्येक घटनेची नोंद घेत आहेत. प्रदूषण विरहित सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज असलेल्या मुंबई मेट्रोला मुंबईकरांनी नेहमीच पसंत दिली आहे. यामुळे मुंबईतील प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवासाची संख्या आता २ लाखाच्या पार गेली आहे, हे फार महत्त्वाचं आहे. याबाबत बोलताना मुंबई उपनगरीय प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख म्हणाले की, मुंबई मेट्रोने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण या निर्णयाने लाखो मुंबईकरांना दिलासा भेटणार आहे. परंतु मुंबईत मेट्रोची अनेक कामे प्रलंबित असून त्या कामांकडे मुंबई मेट्रोने जास्त लक्ष दिल्यास ती कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. यामुळे सुद्धा मोठा दिलासा मुंबईकरांना भेटणार आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत पावसाळ्यात लोकल रेल्वे, रस्ते वाहतूक यापेक्षा मुंबई मेट्रोला प्रवाशांची पसंती जास्त असल्याचे दिसून येत आहे.
मेट्रो प्रवासाला प्रचंड प्रतिसाद : मुंबईत मेट्रो मार्ग २-अ , मेट्रो मार्ग ७ हे दोन्ही मार्ग कार्यरत झाल्यापासून मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या लाखात गाठत आहे. मुंबईतील मेट्रोचा प्रवास हा मुंबईकरांसाठी आरामदायी तर आहेच; परंतु त्यांचा भरपूर वेळ वाचवणारा सुद्धा आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता मुंबईकरांचा मेट्रोतून प्रवासालासुद्धा फार मोठा प्रतिसाद भेटत आहे. असाच प्रतिसाद भेटत राहिल्यास आम्ही अनेक महत्त्वाचे टप्पे गाठत राहू त्यासोबत पावसातही मुंबई मेट्रो सेवा अशीच विना अडथळा कार्यरत राहील याकडे सातत्याने आमचे लक्ष राहील असा विश्वास मुंबई मेट्रो महामंडळाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतून धावणाऱ्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्ग कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवर धावणारी चौथी आणि पाचवी मेट्रो गाडी काही दिवसापूर्वीच आंध्र प्रदेशातील श्री सिटीतून मुंबई मधील आरे कार शेडमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत दाखल झालेल्या मेट्रो गाड्यांची संख्या ५ झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी दरम्यान एकूण ९ गाड्यांची आवश्यकता आहे. आता ५ गाड्या सज्ज असून उर्वरित ४ गाड्यांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती एमएमआरसीने दिली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मेट्रोच्या डब्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही वेग आला असून यापूर्वी झालेल्या गाड्यांची चाचणी पूर्ण झाली आहे.
हेही वाचा:
- Mumbai Rain Update: मुंबईकरांच्या घरात शिरले पावसाचे पाणी, तर रस्ते वाहतुकीवरही झाला परिणाम, दुपारपर्यंत एकूण १० जणांचा मृत्यू
- Delhi Metro : दिल्ली मेट्रोने जिंकले मुंबई मेट्रो लाइन 3 च्या देखभालीचे कंत्राट, फ्रेंच कंपनीला टाकले मागे
- Bombay High Court: न्यायालयाने फेटाळल्या मेट्रोच्या कामाला आव्हान देणाऱ्या याचिका; ठाणे आणि घाटकोपर मेट्रो कामाला हिरवा कंदील