मुंबई : रेड लाइन म्हणून ओळखला जाणारा मुंबई मेट्रो लाइन-७ हा ३३.५-किमी लांबीचा मुंबई मेट्रो मार्ग दहिसरला अंधेरी आणि पुढे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडेल. (Mumbai metro from Andheri to Dahisar). या मार्गावर 29 मेट्रो स्थानके असतील. त्यापैकी 14 उन्नत आणि उर्वरित भूमिगत असतील. 2020 मध्ये मुंबई मेट्रो मार्गावरील ऑपरेशन्स सुरू होणे अपेक्षित होते. तथापि, कोविड-19 महामारीमुळे मार्गावरील नागरी कामास विलंब झाला. मात्र आता याचे जवळजवळ काम पूर्ण झालेले आहे. 26 जानेवारी रोजी हा मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
8 जानेवारीला मेगाब्लॉक : मेट्रो लाइन ७ च्या फेज-२ चे बांधकाम ९८% पूर्ण झाले आहे. मुंबई मेट्रो लाईन 7 चा पहिला टप्पा 2 एप्रिल 2022 मध्ये सुरू झाला, तर फेज-२ च्या चाचण्या ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती. तर व्यावसायिक ऑपरेशन डिसेंबर 2022 ऐवजी 26 जानेवारी 2023 पासून अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकात्मिक सिग्नल यंत्रणा दुरुस्ती तसेच चाचणी अनुषंगाने 8 जानेवारीला सकाळी ०६ वाजे. पासून रात्री १० वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega block on Mumbai metro). या काळात मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल. मेट्रो मार्ग २अ आणि ७ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी फेज १ आणि २ या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळेच या मार्गावरील सिग्नलियंत्रणा ही एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी ही सेवा दोन्ही बाजूंना 8 जानेवारी रोजी तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये सर्व काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे या उद्देशाने पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी होईल. ही चाचणी करताना अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि तांत्रिक काम करताना अचूकता असावी लागते. त्याकरिता मेट्रो सेवा बंद ठेवावी लागत आहे.
प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासली जाईल : दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा संरेखित केला जाईल. यामध्ये ज्या प्रणाली अस्तित्वात आहे त्या प्रणाली नीटपणे चालत आहेत की नाही तसेच त्यामध्ये कोणता बदल करणे जरुरी आहे अथवा त्यात काही नवीन सुधारणा करणे जरुरी आहे हे देखील पाहिले जाईल. जेणेकरून मेट्रो सेवा ही दुरुस्तीच्या कामानंतर पूर्ववत सुरू राहील. प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात महत्त्वाच्या बाबी तपासणे अत्यावश्यक आहे. मुंबईसारख्या महानगरामध्ये पुढील होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्या आणि ते टाळण्यासाठी काय काय करायला हवे आणि प्रवाशांना वेळीच सावध कसे करता येईल इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील या ठिकाणी कामे केली जाणार आहे.
थोडे काम बाकी : या मेट्रो लाईन दोन ए आणि मेट्रो लाईन सात या कधी सुरू होणार याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरण आयुक्त एम श्रीनिवासन यांच्यासोबत ई टीव्ही भारतने बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, 'पुढील काही दिवसातच या मेट्रो मार्गिका सुरू होणार आहेत. त्यामुळेच हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. आता जवळजवळ सर्व काम पूर्ण झालेले आहे. मात्र सिग्नल यंत्रणा आणि त्यासोबत तांत्रिक अभियांत्रिकी काम जे आहेत त्याची तपासणी त्याची प्रायोगिक तपासणी या गोष्टी झाल्या की पुढील काही दिवसातच मेट्रो या मार्गावरून सुरू होतील. स्वयंचलित यंत्रणा या मेट्रो मार्गीके मध्ये असल्यामुळे त्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, ते योग्य रीतीने बसले आहे की नाही याची खात्री करणे हे थोडे काम बाकी आहे. प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच मेट्रो २अ आणि ७ चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग १ सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल'.