मुंबई - महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेले कित्येक वर्ष सुरू आहे. सीमा भागातील ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करावे, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यासाठी महापौर पेडणेकर यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे.
पंतप्रधानांना पत्र -
पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात, सन १९५६ मध्ये देशात भाषावार प्रांतरचना करताना सुमारे ८६५ गावे जी मराठी भाषिक आहेत ती कर्नाटक राज्यात गेली. तेथील सुमारे ४० लाख नागरिक महाराष्ट्रात येऊ इच्छितात. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना आपल्या मायबोलीपासून दूर रहावे लागत असून इच्छेविरुद्ध दुसरी भाषा त्यांच्यावर लादण्यात येत आहे. हा त्या नागरिकांवर अन्याय असून येथील नागरिक गेली ६५ वर्षे महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत. ९ ऑगस्ट, क्रांतीदिनाचे औचित्य साधून सर्व ४० लाख मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करुन न्याय द्यावा अशी विनंती महापौरांनी केली आहे.
सीमा भागातील लढा -
संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, १८ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद झाले. तर २५० हून अधिक जण जखमी झाले होते. १९५६ मध्ये बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा आजही अखंड सुरु आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक, या मुद्दयांवर झाली चर्चा