मुंबई - लसीकरण आणि कोरोना आकडेवारीवरून ठाकरे सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधीपक्ष नेत्यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. 'दोन दिवसात लस विकत घेण्यासाठी पालिका आयुक्त ग्लोबल टेंडर काढत आहेत. ५० लाख लसी ग्लोबल टेंडरमार्फत महापालिका खरेदी करणार आहे', असे पेडणेकरांनी म्हटले आहे.
कोरोना लसीकरण वेगाने होण्यासाठी मुंबई महापालिका आणखी 4 लसी उपलब्ध करणार आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यामुळे लवकरच फायझर, स्फुटनिक, जॉन्सन आणि मॅार्डना या लशींचे ५० लाख डोस उपलब्ध होणार, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
'ग्लोबल टेंडर काढणार'
'कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबईत लसीकरणाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रोज लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन लस दिली जात असून उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण केले जाते आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने फायझर, स्फुटनिक, जॉन्सन आणि मॅार्डना या लसी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पालिका ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यामुळे 4 कंपन्यांच्या लसींसाठी हे टेंडर असणार आहे. महापालिका लस यापुढेही मोफत देणार आहे. टेंडर काढल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या लसींमधील काही लसींचा एकच डोस दिला जातो. या लसी उपलब्ध झाल्या तरी सध्या सुरु असलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सीन लसींचे डोसही दिले जाणार आहेत', अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
'लसींसाठी पोलिकेने खर्च करावा'
मुंबईमधील लसीकरणाबाबत आज (10 मे) भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. 'काल (9 मे) आम्ही पालिका आयुक्तांची भेट मागितली होती. मात्र, भेट नाकारण्यात आली होती. आज भेट झाली. या भेटीदरम्यान केंद्र सरकार २५ वर्षावरील नागरिकांसाठी लस पाठवत आहे. मुंबईत १८ ते ४४ वयामधील ५० लाख ५० हजार नागरिक आहेत. या नागरिकांना लस देण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पालिकेच्या बँकांमध्ये करोडोंच्या ठेवी आहेत. त्यामुळे पालिकेने हा खर्च पालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली', असे दरेकरांनी सांगितले.
विरोधकांवर निशाणा
'जे मोफत लस द्या म्हणून गळे काढत आहेत, त्यांनी पालिका लसीकरण सेंटरवर यावे. तिथं मोफतच लस दिली जातेय. कोविन अॅपमध्ये त्रुटी जाणवत आहेत', असे म्हणत पेडणेकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
कोरोना आकडेवारीवरून विरोधकांवर टीका
'आयुक्तांपुढे गोड गोड बोलतात आणि बाहेर येवून आकड्यांची लपवाछपवी केली म्हणून सांगतात. मग तिथेच आयुक्तांना कोरोना आकडेवारीबद्दल विचारायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनाच्या लढाईबाबत योग्य नियोजन केल्याबद्दल ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. मग मोदींवरही तुमचा विश्वास नाही का? खोडे घालायचे तेवढे घाला, आम्ही काम करत राहू', असे किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे.
आतापर्यंत २७ लाख नागरिकांचे लसीकरण
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु झाली. एकूण १३६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाते. मात्र, सध्या ८६ केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत २७ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील दुसरा डोस 6 लाख नागरिकांनी घेतला आहे.
हेही वाचा - घृणास्पद..! नागपुरात ५४ वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर पलटी