मुंबई - महिलांनी कोरोना आजाराची भिती असतानाही न डगमगता काम केले. स्वत:ला कामात झोकून देऊन समाजासाठी भरीव योगदान दिले. या महिलांचे कार्य प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १८ कोरोना योद्धा महिलांचा गुरुवारी प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.
गामा फाउंडेशन प्रस्तुत व पूजा एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने 'कोरोना योद्ध्यांना सलाम' या कार्यक्रमांतर्गत समाजातील कर्तृत्ववान १८ महिलांचा ऑनलाइन सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. ऑनलाइन वेबिनारद्वारे आयोजित समारंभात प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुप्रिया सुळे, डॉ. पल्लवी साबळे, नगरसेविका अनुराधा पोतदार, कामिनी शेवाळे, सरिता चव्हाण, स्नेहा वाघ यासोबतच अठरा सत्कारमूर्ती महिलांची उपस्थिती होती.
जन्मजातच स्त्रीमध्ये विविध संकटांवर मात करण्याची क्षमता विकसित झालेली असते. कोरोना महामारी दरम्यान डॉक्टर, परिचारिका, महिला पोलिसांपर्यंत सर्व महिलांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्याचे जितके कौतुक करावे ते कमीच असल्याचे महापौर म्हणाल्या. कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका या देव म्हणून धावून आल्या असून सद्यस्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही. लस येईपर्यंत नागरिकांनी मास्क हीच लस समजून मास्कचा नियमितपणे वापर करावा, अशा सूचनाही महापौरांनी केल्या.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले.