मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापौरांना पुढील 10 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला रुगणलायकडून देण्यात आला आहे. पेडणेकर यांचा दहा दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून मुंबईकरांना रुग्णालयात सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून महापौर किशोरी पेडणेकर सतत कार्यरत होत्या. कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी अनेकवेळा पीपीई किट घालून महापौरांनी आयसीयू आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला होता. मुंबईत एप्रिल महिन्यात 53 पत्रकार पॉझिटिव्ह आले तेव्हा महापौरांनी कोरोना टेस्ट केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल झाल्यावरही त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोन्ही वेळा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, तिसऱ्या वेळी महापौरांनी अँटीजेन टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.