मुंबई - धार्मिकस्थळे उघडल्यावर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढली आहे. देशात आणि देशाबाहेर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार लहान मुलांमध्ये झाल्यास कुटुंबाच्या कुटुंब संक्रमित होतील. त्याअनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
तर कुटुंबच्या कुटुंब संक्रमित होतील -
कोरोनाची दुसरी लाट आणि कोरोनाचे वाढणारे रुग्ण या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची जी संख्या वाढते आहे त्यात लहान मुलांचीही संख्या वाढत आहे. कोरोना झाल्यावर किडनी, हार्ट, लिव्हर यावर त्याचे परिणाम होत आहेत, असे जागतिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे. मुंबईत धार्मिक स्थळे उघडल्यावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अशावेळी लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. लहान मुले गेले नऊ महिने घरात आयसोलेटेड होती. ती एकदम बाहेर पडली तर मुले संक्रमित होऊन कुटुंबाच्या कुटुंब संक्रमित होतील.
हेही वाचा - 'शिवसेनेचं हिंदूत्व अन् भगवा भेसळयुक्त, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर सत्तेत'
पालकांनीही इतक्यात शाळा सुरू करू नका, अशी मागणी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून केली होती. कोरोनाचे संकट कमी झाले आहे. मात्र, पूर्णपणे संपलेले नाही. त्या अनुषंगाने आयुक्तांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय योग्य असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ! -
राज्य सरकारने येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतातही दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईमधील पालिकेच्या आणि खासगी शाळा २३ नोव्हेंबरला सुरू न करता ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घेतला आहे.