मुंबई - जागतिक दर्जाचे शहर व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने लसीकरणात आघाडी घेतली आहे. चार महिन्यांत 29 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. मुंबईत लसीकरण मोठ्या संख्येने होत आहे. यामुळे पालिकेने लसीकरणात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आदी वर्गांतील कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने ठरवलेल्या उद्दिष्टापासून महापालिका पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - ठाणे : काेपरी रेल्वे ब्रीजच्या कामामुळे ठाणे-मुंबई मार्ग सात तास बंद
लसीकरण मोहीम -
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत वर्षभरात 6 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. हा प्रसार या वर्षी जानेवारी दरम्यान काही प्रमाणात कमी झाला. कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू नये म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील आजारी असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. तर, 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत होती. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने या वयोगटांतील नागरिकांना लस देण्याचे बंद करण्यात आले. सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, तसेच 45 व 60 वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे.
आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची पाठ
मुंबईत 3 लाख आरोग्य कर्मचारी असल्याची नोंद करण्यात आली. या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिड महिन्यात लस दिली जाणार होती. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना एकूण 2 लाख 99 हजार 538 डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 1 लाख 82 हजार 951 कर्मचाऱ्यांना पहिला, तर 1 लाख 16 हजार 587 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच, फ्रंटलाईन वर्कर म्हणून 8 लाख कर्मचाऱ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी 2 लाख 31 हजार 569 कर्मचाऱ्यांना पहिला, तर 1 लाख 25 हजार 991 कर्मचाऱ्यांना दुसरा, असे एकूण 3 लाख 57 हजार 560 डोस देण्यात आले.
45 ते 49 वर्षांमधील 8 लाख 29 हजार 211 लाभार्थ्यांना पहिला, तर 3 लाख 39 हजार 578 लाभार्थ्यांना दुसरा, अशा एकूण 11 लाख 68 हजार 789 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 60 वर्षांवरील 8 लाख 82 हजार 554 लाभार्थ्यांना पहिला, तर 1 लाख 48 हजार 397 लाभार्थ्यांना दुसरा, अशा एकूण 10 लाख 30 हजार 951 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर, 18 ते 44 वयोगटातील 72 हजार 919 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहिल्यास आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण दिड ते दोन महिन्यात केले जाणार होते, मात्र या कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याने चार महिने झाले, तरी अद्याप हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली असली तरी 45 ते 59 वर्षांमधील व 60 वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पालिका लसीकरणात आघाडीवर आहे.
एकूण लसीकरण
मुंबईत आतापर्यंत एकूण 29 लाख 29 हजार 757 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 21 लाख 99 हजार 204 लाभार्थ्यांना पहिला, तर 7 लाख 30 हजार 553 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. त्यात 2 लाख 99 हजार 538 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 57 हजार 560 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 68 हजार 789 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार व इतर 10 लाख 30 हजार 951, तर 18 ते 44 वर्षांमधील 72 हजार 919 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरण मोहीम
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध, तसेच 45 ते 59 वर्षांमधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक, तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जात आहे. तर, गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन अॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल, तरच लसीकरणाला या, असे आवाहन पालिकेने केले आहे.
लसीचा तुटवडा
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लसीचे डोस दिले जात होते. लसीकरणाला मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने व लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेकवेळा लसीकरण ठप्प झाले होते. लसीच्या तुटवड्यामुळे शनिवार (15 मे) आणि रविवार (16 मे) असे दोन दिवस लसीकरण बंद होते. तर, सोमवारी (17 मे) ला तौक्ते चक्रीवादळामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा लसीकरण सुरू असून लसीच्या पुरावठ्याप्रमाणे लसीकरण केले जात आहे.
वेळोवेळी केले आवाहन
सुरुवातीला लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी, तसेच फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले होते. लस घेण्यासाठी आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी पुढे यावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. वेळोवेळी त्यांना आवाहन करण्यात आले आहे. आताही त्यांना लसीकरणात प्राधान्य दिले आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,99,538
फ्रंटलाईन वर्कर - 3,57,560
जेष्ठ नागरिक - 11,68,789
45 ते 59 वय - 10,30,951
18 तर 44 वय - 72,919
एकूण - 29,29,757
हेही वाचा - दिलासा.. राज्यात ऑक्सिजनची मागणी घटली.. कोरोनाची दुसरी लाट ओसरणीला !