मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना काही रुग्ण या आजारातून पुर्णपणे बरे झाल्याने काही अंशंत: दिलासा मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असताना वृत्तपत्र माध्यमांतील प्रतिनीधिंना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यापैकी सायन पूर्व परिसरातील प्रतिक्षा नगरमधील एका पत्रकाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाली होती. मात्र, या पत्रकाराने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राहत असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी त्यांचे स्वागत केले आहे.
मुंबईत जवळपास ५३ पेक्षा अधिक पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी काहीजण ग्राऊंड रिपोर्टिंग करणारे आहेत. गेल्या आठवड्यात पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील १६७ जणांची कोरोनाची टेस्ट केली होती. यामध्ये १६७ जणांपैकी ५३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामधील सर्वाधिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.
सायन पूर्व परिसरातील रहिवासी असलेल्या पत्रकाराची दुसरी कोरोना तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.