मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ आता मुंबईतून आणखी एक बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई- हैदराबाद या ७११ किलोमीटर मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून एनएचआरसीएलला NHRCL सादर करण्यात आले आहे. अशी माहिती एमएमआरडीएच्या MMRDA अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता पुन्हा एकदा वेगात सुरू झाले आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल येथे स्टेशन उभारले जात आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन सुरु करण्यासंदर्भातील अहवाल पूर्ण झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या काय आहे स्थिती ? मुंबई ते हैदराबाद प्रवासासाठी सध्या १४ तास लागतात. बुलेट ट्रेनने हा प्रवास आता फक्त तीन तासांत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या विकासात हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर, नांदेड, गडचिरोली यासह अन्य जिल्ह्यांलगत असलेल्या तेलंगणाच्या सीमा पाहता हा मार्ग वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाचा ठरेल, असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कसा असेल हा मार्ग ? या प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि हैदराबाद या ११ रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. ठाणे जिल्ह्यात ९ किमीचा मार्ग असणार आहे. हा मार्ग पुणे जिल्ह्यातून जाणार असून पुण्यातील तीन महत्त्वाच्या स्थानकांचा यात समावेश असून त्यादृषटीने काम सुरू असल्याची माबीती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाण्यात होणार भूसंपादन ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांत भूसंपादन होणार आहे. ७११ किमीच्या या मार्गावर प्रती तास ३५० किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावेल, असा त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा वेग सरासरी २५० किमी प्रती तास असेल. रूळ स्टँडर्ड गेजचे असणार असून, एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे.
मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबई- पुणे- हैदराबाद बुलेट ट्रेनसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला हा प्रकल्प हायपर लूपच्या माध्यमातून करण्याचा विचार होता. मात्र नंतर तो रद्द करण्यात आला. सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक एरियल लिडार आणि इमेजरी सेन्सरने बसवलेल्या विमानाने पाहणी करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून हा अहवाल नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला (एनएचआरसीएल) सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.