मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 12 हजार कोटींहून अधिकचा चुना लावून फरार झालेल्या आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मेहुल चोक्सीच्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण धर्माधिकारी आणि न्यायाधीश साधना जाधव यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
फरार आर्थिक गुन्हेगारांवरील कारवाईवर स्थगिती देणे योग्य नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मेहुल चोक्सी याच्या विरोधात ईडी आणि सीबीआय कडून कारवाई केली जात आहे. त्या संदर्भातील पुरावे विशेष न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आलेले आहे. विशेष न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यातील साक्षीदारांची उलट तपासणी करण्याची परवानगी मिळावी म्हणून मेहुलच्या वकिलांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
हेही वाचा - "चिदंबरम यांची अटक सुडबुद्धीने केलेली कारवाई, निर्दोष सुटतील हा विश्वास"
याबरोबरच मेहुल चोक्सीच्या विरोधातील कारवाई ही नियमांना धरून नसल्याचेही त्याच्या वकिलांनी म्हटले होते. त्यामुळे यावर स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.