मुंबई Bail To Don Raja Kaikadi : पनवेलमधील कुख्यात डॉन राजा कैकाडी याच्या विरोधात ऑक्टोबर 2020 मध्ये खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पनवेल सत्र न्यायालयानं त्याला मोक्का कायद्यांतर्गत 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावलेली होती; मात्र जामीन मिळण्यासाठी आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी उपलब्ध तथ्याच्या आधारे आरोपीला अंतरिम जामीन मंजूर केला. हे आदेशपत्र 23 नोव्हेंबर रोजी न्यायालयानं जारी केलं.
गुंडानं दिली धमकी: पनवेल तालुक्यामध्ये करंजाडे या ठिकाणी फिर्यादी व्यावसायिकानं 6 ऑक्टोबर 2020 रोजी तक्रार नोंदवली होती की, राजा कैकाडीने त्याला खंडणी मागितली. तसेच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. व्यवसाय करायचा असेल तर हे एवढं करावंच लागेल, असे तो बोलला होता.
आरोपीकडे बेकायदेशीर पिस्तूल सापडले: व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पनवेल पोलिसांनी 6 ऑक्टोबर 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीच्या हालचालीवर पाळत ठेवली. यानंतर पनवेल येथे तो राहत असलेल्या त्याच्या घरावर पोलिसांनी धाड देखील टाकली आणि आरोपीला अटक केली. या धाडीमध्ये पोलिसांना डॉन राजा कैकाडी याच्याकडे अमेरिका अर्थात 'मेड इन यूएसए'चे उत्पादित पिस्तूल सापडले. यानंतर पनवेल न्यायालयानं त्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारावासाची शिक्षा देखील सुनावली होती.
म्हणे खोटा गुन्हा दाखल केला: डॉन राजा कैकाडी याने आपल्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा आहे असं म्हणलं आहे. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप देखील खरे नाही. त्यामुळेच हा खटला रद्द करावा. तसेच आपल्याला जामीन देखील मिळावा, अशी मागणी त्याच्या वतीने वकील भाग्यश्री कुरणे यांनी न्यायालयासमोर केली.
अटी, शर्तीवर जामीन मंजूर: आरोपीवर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यवंशी यांनी मोक्का कायद्यांतर्गत 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीच्या संपूर्ण रेकॉर्डचा अभ्यास केला असता एकूण 5 वर्षांपैकी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ त्याने तुरुंगवास भोगला आहे. नजीकच्या काळात अर्जदाराची सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच आरोपीला अंतरिम जामीन मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक बॉंडच्या आधारे हा जामीन त्याला देण्यात येत आहे. तसेच आरोपीनं संबंधित पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा रविवारी हजेरी द्यावी लागेल. आपला राहत्या घराचा पत्ता, संपर्क क्रमांक पोलीस ठाण्यात देखील द्यावा, अशा शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: