मुंबई Mumbai High Court : शिर्डी येथे राहणाऱ्या रहीम मुनावर पठाण याच्यावर दुहेरी हत्याकांडाचा आरोप असून कलम 302 नुसार नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. अकरा वर्षांपासून तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. यापूर्वी त्यानं पोलीस महासंचालकांकडं फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यानं पोलीस महासंचालकांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयानं त्यांचा अर्ज मंजूर केला आहे.
पोलीस महासंचालकांनी फेटाळला अर्ज : रहीम मुनावर पठाण या आरोपीनं 6 सप्टेंबर 2021 रोजी नाशिक जिल्हा तुरुंग अधीक्षकांकडे फर्लो रजेसाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यानं पोलीस महासंचालकांकडं अर्ज केला. मात्र, यावेळेसही त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यानं पोलीस महासंचालकांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर दाखल केली. न्यायालयानं त्याचा 28 दिवसांचा फर्लो मंजूर करत तुरुंग अधीक्षक आणि पोलीस महासंचालकांचा निर्णय रद्द केलाय.
राज्य पोलीस महासंचालकांचा निर्णय रद्द : या संदर्भात उच्च न्यायालयात बाजू लढवणारे वकील नितीन सातपुते म्हणाले की, "दुहेरी खुनामध्ये रहीम मुनावर पठाण याला जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यानं तुरुंग प्रशासन आणि राज्य पोलीस महासंचालकांकडे रजेचा अर्ज केला होता. पण त्यांनी तो फेटाळला म्हणून उच्च न्यायालयात त्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयानं फर्लो मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय."
हेही वाचा -
- मराठा समाजातील उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; 'हे' उमेदवार नोकरीसाठी पात्र
- आता दहा कोटी रुपये किंमतीपेक्षा अधिकच्या खटल्यांवरच मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी, विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
- Mumbai High Court : तब्बल 18 वर्षानंतर जवानाच्या कुंटुंबाला न्याय, वृद्ध आई-वडिलांना नुकसान भरपाई