मुंबई - भाजपा नेते गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. नाईक यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. 25 हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. नाईक यांच्यावर नवी मुंबईतील एका महिलेकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
भाजप आमदार गणेश नाईक यांना न्यायालयाने 25 हजारांच्या हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शनिवारी फेटाळला होता. उच्च न्यायालयात गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आरोप झाल्यानंतर गणेश नाईक समोर आले नाहीत. परंतु अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर माध्यमांसमोर येऊन ते आपली प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
पीडित महिलेचा नेमका आरोप काय? - गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. गणेश नाईक हे मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिलं होतं की, मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतु त्यांनी तसं काहीच केलं नाही. नाईकांनी आम्हाला कोणतंच आर्थिक पाठबळ दिलं नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुलगा झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप या महिलेने केलाय. तसंच नाईक आणि त्यांच्या परिवारानं मला अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिली. अनेकवेळा त्यांच्या मुलाकडून मला धमक्याही देण्यात आल्या. एकदा माझा मुलगा त्यांच्या बालाजी टॉवर या राहत्या घरी गेल्यावर त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मी स्वत: मुलाला घेऊन गेल्यानंतर आम्हाला हाकलून देत, अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
माझा शारीरिक आणि मानसिक छळ नाईक यांनी केलाय. आता त्यांच्याविरोधात अनेक संघटना, पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होतेय. पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. मला न्याय आणि माझा हक्क मिळाला पाहिजे. मी वकिलामार्फत माझी लढाई लढत आहे अशी माहितीही त्यांनी दिलीय.