मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी 'मीडिया ट्रायल' सुरू आहे. यामुळे जाणून-बुजून मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब केली जात असल्याचे म्हणत मुंबई पोलीस खात्यात एकेकाळी आपला दबदबा निर्माण करणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये 31 ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगून वार्तांकन करावे. तपासात कुठेही बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेत, अशा प्रकारचे वार्तांकन करण्यापासून स्वतःला रोखावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सुशांतसिंह राजपूतप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. यामध्ये राजकारण सुद्धा केले जात आहे. यामुळे मीडिया ट्रायल सुरू असून मुंबई पोलिसांची छबी जाणून-बुजून खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे याचिकेमध्ये म्हणण्यात आलेले आहे. ही याचिका मुंबई पोलीस खात्याचे माजी पोलीस महासंचालक एम.एन सिंग, पीएस पसरीचा, डिके शिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर आणि के. सुब्रमण्यम या माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल केलेली आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करत मीडियाकडून सुरू असलेल्या बदनामीकारक वृत्तांकनावर आवर घालण्याची विनंती या याचिकेत करण्यात आलेली आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सध्या सीबीआय, ईडी व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. या तपासादरम्यान वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांकडून कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता बदनामीकारक वृत्तांकन केले जात आहे. यामुळे मुंबई पोलिसांवर नाहक टीका होत असून नागरिकांमध्ये एक वेगळे वातावरण मुंबई पोलिसांना घेऊन निर्माण केले जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
हेही वाचा - मुंबई 'पीओके' असल्यासारखे वाटते; कंगणा रनौतचा संजय राऊतांवर निशाणा