मुंबई - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या काही घटनाही झाल्या आहेत. असे असताना मुंबईत मात्र आशादायी चित्र आहे. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी सध्या 115 मेट्रिक टन अर्थात 1 लाख लिटरहून अधिक ऑक्सिजन लागत आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त साठा उपलब्ध असल्याने मुंबईत ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. महापालिकेच्या 7 जम्बो कोविड सेंटर आणि पालिका रुग्णालयांना केवळ 20 टक्के ऑक्सिजनच्या साठ्याची गरज आहे तर 80 टक्के साठा राखीव असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
मुंबईत गणेशोत्सवापासून कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच गणेशोत्सवाअगोदर असणारा 18 ते 20 हजार अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 18 सप्टेंबरला 34 हजारा पार गेला. यादरम्यान ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार 17 सप्टेंबरपर्यंत 1 हजार 265 रुग्ण गंभीर असून आयसीयूमध्ये 1 हजार 583 रुग्ण आहेत. त्याचवेळी ऑक्सिजनवर 5 हजार 919 रुग्ण असून व्हेंटिलेटरवर 1 हजार 5 रुग्ण आहेत. ऑक्सिजन-व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा आकडा वाढल्याने साहजिकच ऑक्सिजनची मागणीही मुंबईत काही प्रमाणात वाढली आहे. अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या घडीला मुंबईत कोरोना रुग्णांना 115 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, मुंबईत मुबलक साठा असल्याने कुठेही ऑक्सिजनची कमतरता नाही. आयनॉक्स, लिंदे, फिनिक्ससारखे अन्य मोठे प्लँटही मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचे वितरणही तत्काळ होत असून मुंबईत ऑक्सिजनची कसली ही कमतरता नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेकडे ऑक्सिजनचा अडीच लाख लिटर साठा -
संपूर्ण मुंबईत एक लाख लिटरपेक्षा अधिक ऑक्सिजन लागत आहे. यात सरकारी-पालिका-खासगी रुग्णालये आणि कोविड सेंटरचा समावेश आहे. अशावेळी पालिका रुग्णालय-कोविड सेंटरचा विचार केला तर पालिकेकडे अडीच लाख लिटर इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
वरळी, बीकेसी, नेस्को-गोरेगाव, दहिसर (दोन सेंटर), मुलुंड आणि अन्य एका ठिकाणी असे 7 कोविड सेंटर कार्यरत आहेत. या सर्व सेंटरला ऑक्सिजनचा तुडवडा होऊ नये यासाठी दूरदृष्टीने सातही सेंटरमध्ये टर्बो अर्थात ऑक्सिजनच्या मोठ्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. 13 हजार आणि 26 हजार लिटरच्या या टाक्या असून काही ठिकाणी 1 तर काही ठिकाणी दोन टाक्या बसवण्यात आल्या आहेत. रुग्णालयातही टाक्या आणि सिलेंडरची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या घडीला पालिकेकडे अडीच लाख लिटरचा साठा उपलब्ध असून यातील 20 टक्केच ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे 80 टक्के साठा शिल्लक राहत असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.
त्याचवेळी ऑक्सिजन सिलेंडरचाही मोठा साठा असून सिलेंडरचा वापर करण्याची तितकीशी गरज लागत नाही. त्यामुळे सिलेंडरचा वापर बॅकअप म्हणून केला जात आहे. एकूणच मुंबईची परिस्थिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत खूपच चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांच्या अडचणी सोडवू -
महानगरपालिका-सरकारी रुग्णालयाकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा आहे. तर खासगी रुग्णालयातही ऑक्सिजनची कमतरता दिसून येत नाही. मात्र, जर खासगी रुग्णालयाला ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यास काही अडचणी येत असतील किंवा उत्पादक-वितरकाकडून काही अडथळे येत असतील तर रुग्णालयांनी पालिकेकडे यावे. त्यांच्या या अडचणीही आम्ही सोडवू असे काकाणी यांनी स्पष्ट केले.