मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेले तीन महिने वाहने एकाच जागी धूळ खात पडली आहेत. ही वाहने चालविण्यापूर्वी त्यांची योग्य ती सर्व्हिसिंग करावी, अन्यथा गाडी पेट घेऊ शकते. अशा प्रकारच्या घटना मुंबईत झाल्या असल्याने सर्व्हिसिंग केल्यानंतरच गाड्या रस्त्यावर आणा आणि अपघात टाळा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना केले आहे.
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेले लॉकडाऊन आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मुंबईकरांसह वाहनेही मोठ्या प्रमाणात आली आहेत. मात्र, अनेक दिवस बंद असलेली वाहने धोकादायक ठरू शकतात, अपघाताला कारणीभूत ठरू शकतात, असे आढळले आहे. काही दिवसांपूर्वी नाना चौक परिसरात असलेल्या उषाकिरण इमारतीत गाडीने पेट घेतल्याची घटना घडली होती.
गाडीचा मालक गाडी घेऊन बाहेर गेला होता. परत आल्यानंतर तो गाडी पार्क करत असतानाच गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्याने कसेतरी करून इंजीन बंद केले. मात्र, इंजिनसह गाडीने पेट घेतला. याची माहिती अग्निशमन दलाला दिल्यावर जवानांनी ती आग विझवली. आगीच्या कारणांचा शोध घेतल्यावर ही गाडी तीन महिने बंद होती. त्यामुळे या गाडीच्या इंजिनमधील इलेक्ट्रिक सर्किट खराब झाले होते. गाडी सुरू झाल्यानंतर सर्किटमध्ये स्पार्क झाला आणि गाडी पेटली.