मुंबई - कांदीवली येथील हिरानंदिनी सोसायटीत बोगस लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला होता. या लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या लसी गुजरात आणि दीव दमण येथील असल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून पालिकेला पाठवण्यात आलेल्या पत्रातून ही बाब उघड झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ही माहिती पोलिसांना दिली जाणार असून त्या माहितीनुसार आता पोलीस पुढील तपास करणार आहे.
हिरानंदानी सोसायटीत गुजरात, दिव दमण येथील लस
कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीत ३० मे रोजी ३९० रहिवाशांना लस देण्यात आली होती. लस दिल्यानंतर एकालाही ताप आला नव्हता किंवा अंगदुखी झाली नाही तसेच लसीकरण झाल्याचे विविध ठिकाणची प्रमाणपत्रे मिळाली. त्यामुळे येथील रहिवाशांनी आपली फसवणूक झाल्याची कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाची दखल घेत पालिकेने पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला पत्र लिहिले होते. लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या लसीच्या बॅच कुठे वितरित करण्यात आल्या होत्या याची माहिती पत्राद्वारे मागवली होती. त्यानुसार या लसींचा गुजरात आणि दिव दमण येथून पुरवठा करण्यात आल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटने दिल्याचे आयुक्त काकाणी यांनी सांगितले.
महापालिका पोलिसांना देणार माहिती
कांदिवली येथील बोगस लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या लसी गुजरात आणि दिव दमण येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती पोलिसांना दिली जाईल. रिकाम्या व्हाईल्स अद्यापही पोलिसांना हस्तगत करता आलेल्या नसल्याने सर्टिफिकेटच्या बॅच नंबरवरून तपास केला जात आहे. रहिवाशांना खरोखरच लस दिली गेली की दुसरे काही दिले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असेही काकाणी यांनी सांगितले.
असे झाले होते बोगस लसीकरण
हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरणात सुमारे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येकी १,२६० रुपये याप्रमाणे एकूण ४,५६,००० रुपये या लाभार्थी रहिवाशांनी दिले. मात्र, लसीकरण करणाऱ्या संबंधित चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती. तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. हा सर्व प्रकार संशय निर्माण करणारा असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पालिकेची परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करता बनावट लसीकरण करण्यात आल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे.