मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ईडीकडून सुशांतच्या तीन कंपन्यांतील आर्थिक व्यवहाराशी संबंधित चौकशी केली जात आहे. सुशांतचा सीए, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडासह सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांची ईडीकडून कसून चौकशी केली जात आहे. यामुळे रिया चक्रवर्ती हिला सोमवारी पुन्हा एकदा ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.
शनिवारी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोभित चक्रवती याची तब्बल अठरा तास ईडीने चौकशी केली. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी यावे लागणार आहे. रीया चक्रवर्तीच्या या अगोदर करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान तिने सुशांतसिंह राजपूतचा कुठलाही पैसा आपण स्वतः साठी वापरला नसल्याचे ईडीला सांगितले आहे. तिने विकत घेतलेली संपत्ती ही तिच्या स्वतःच्या पैशांमधून घेतली असून यामध्ये तिने काही बँकांकडून कर्जसुद्धा घेतल्याचे ईडीला सांगितले आहे. ईडीकडून रिया चक्रावर्तीचा जवाब नोंदवल्यानंतर तिला गेल्या 5 वर्षांचा आयकर भरणा केलेल्या कागदपत्रांसह पुन्हा येण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्तीने सुशांतच्या केवळ दोनच गोष्टी तिच्याकडे असल्याचे म्हटले आहे. यात सुशांतने एका वहीच्या पानावर काही लोकांचे मानलेले आभार व सुशांतच्या 'छिचोरे' या चित्रपटाचे नाव असलेली पाण्याची बाटली यांचा समावेश असल्याचे तिने म्हटले आहे. सुशांतने त्याच्या जवळच्या एका वहीत क्रमांकानुसार त्याच्या कुटुंबातील व्यक्ती आणि रिया बद्दल लिहले होते. यात त्याने म्हटले आहे, की 'मी माझ्या आयुष्यासाठी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील लिल्लूसाठी (शोविक चक्रवर्ती) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील बेबूसाठी (रिया चक्रवर्ती) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील सरांसाठी (केके सिंह, सुशांतचे वडील) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील मॅडमसाठी(सुशांतची आई) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील फजसाठी (सुशांतचा पाळीव कुत्रा) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमासाठी मी कृतज्ञ आहे.'