मुंबई - शहरातील अनेक विद्यार्थी, नोकरदारांची भुक शमवण्याचे काम मुंबईचे डबेवाले गेली कित्येक वर्ष करत आहेत. 'मुंबई डबेवाला असोशिएशन'च्या वतीने 'रोटी बँक' व 'कपडा बँक' हे दोन सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांना सुरुवात झाली. दोन गाड्यांच्या मदतीने दररोज २०० ते ३०० भुकेल्यांना 'रोटी बँक' जेवू घालते. शहरात होणाऱ्या पार्ट्यांमध्ये शिल्लक राहिलेले अन्न जमा करुन गरजू लोकांपर्यंत पोहचवले जाते. 'रोटी बँक' सुरू झाल्यापासून सुमारे एक कोटी रूपयांचे अन्न वाया जाण्यापासून वाचवले गेले.
हेही वाचा - काँग्रेस आक्रमक : राज्य सरकारने १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा
'रोटी बँक'प्रमाणे 'कपडा बँक' काम करते. मुंबईमध्ये कपड्याची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे कमी दरात कपडे उपलब्ध होतात. परिणामी सर्रास लोक नवीन कपडे घेतात व जुने कपडे टाकून देतात. जुने कपडे डबेवाला असोसिएशनमध्ये जमा करण्याचे सुभाष तळेकर यांनी लोकांना आवाहन केले. दोन वर्षांपासून 'कपडा बँक'च्या माध्यमातून दिवाळीच्या अगोदर आदिवासी बांधवांना या कपड्यांचे वाटप केले जाते.
यापुर्वीही देशात जेव्हा आपत्ती ओढावली तेव्हा मुंबई डबेवाला असोशिएशनने मदत केली आहे. मुंबई, सांगली, कोल्हापूर आणि केरळमध्ये आलेल्या पूरावेळी असोसिएशनने पुरग्रस्तांना मदत केली होती.