मुंबई Mumbai Crime : आयकर विभागाचे अधिकारी बनून व्यापाराच्या घरात धाड टाकणारी टोळी सायन पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीनं व्यावसायिकाचे तब्बल 18 लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. सायन पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शानुस पाथवीलाल, राजाराम दादू मांगले, अमरदीप लक्ष्मण सोनवणे, भाऊराव उत्तम आंगळे, सुशांत रामचंद्र लोहारे या आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
बनावट आयकर विभागाचे अधिकारी होऊन आले अन् : काही दिवसांपूर्वी आयकर विभागाचे अधिकारी बनून सायन इथल्या व्यापाराच्या घरात छापेमारी केली होती. छापेमारीच्या नावाखाली घरातील सगळी रोकड आणि संबंधित कागदपत्रं दाखवण्यास त्या टोळीनं कुटुंबीयांना आदेश दिले. या व्यापाऱ्याच्या कुटुंबानं बहिणीच्या लग्नासाठी आणलेली तब्बल 18 लाख रुपयांची रोकड या बोगस अधिकाऱ्यांसमोर ठेवली. कागदपत्रं तपासण्याचा बनाव करत पैशांचे फोटो काढले. काही दिवसातच तपास पूर्ण करू, मात्र तोवर रोकड जप्त करत असल्याची बतावणी त्यांनी केली. यावेळी 18 लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. चार दिवस उलटूनदेखील जेव्हा काहीच झालं नाही, तेव्हा कुटुंबानं चौकशी करण्यास सुरुवात केली. या चौकशीत ही छापेमारी बनावट असल्याचं समोर येताच त्यांनी सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली.
बहिणीच्या लग्नासाठी आणली होती रोख रक्कम : या व्यापाऱ्याच्या घरात बहिणीचं लग्न होतं. त्यासाठी त्यानं घरात रोख रक्कम आणून ठेवली होती. मात्र आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत आरोपींनी 18 लाखाची रक्कम हडपली होती. सायन पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत इमारतीतील तसेच परिसरातून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. आरोपींच्या ईनोव्हा गाडीच्या नंबरवरुन शोध घेत पोलिसांनी आठही आरोपींना बेड्या ठोकल्या. कुटुंबातील एका तरुणाच्या मित्राला घरात असलेल्या रोख रकमेची माहिती होती. त्यानंच आरोपींना टीप दिल्याचं तपासत निष्पन्न झालं असल्यानं त्यालादेखील सायन पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना सापडले आयकर अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र : सायन पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपीना पाच आरोपींना अटक केली. तेव्हा बनावट आयकर अधिकाऱ्यांचे ओळखपत्र पोलिसांना सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शानुस पाथवीलाल ( वय 37 वर्ष), राजाराम दादू मांगले ( वय 47 वर्ष), अमरदीप लक्ष्मण सोनवणे ( वय 29 ), भाऊराव उत्तम आंगळे ( वय 54 ) , सुशांत रामचंद्र लोहारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या टोळीचा मास्टरमाईंड शरद हनुमान एकवडे ( वय 33 ) हा असून तो नवी मुंबईचा राहणारा असल्याचं पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी यावेळी सांगितलं. तर आरोपी अभय लक्ष्मण ( वय 33 वर्षे) , रामकुमार छोटेलाल गुजर ( वय 38 वर्ष ) या डिलिव्हरी बॉयलाही अटक करण्यात आलं असल्याचं ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :