मुंबई Mumbai Crime : एनसीबी मुंबईने पॅन इंडिया नेटवर्कसह आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. एका झांबियन नागरिकाला मुंबईच्या हॉटेलमध्ये 2 किलो कोकेनसह 9 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. तसंच या प्रकरणाचा पाठपुरावा करत करण्यात आलेल्या कारवाईमुळे यासंबंधित एका टांझानियन महिलेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घवाटे यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटची योजना कळाली : सणासुदीच्या काळात अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याच्या प्रयत्नात, एनसीबीकडून गुप्त माहिती गोळा करण्यात आली. ज्यामध्ये असं लक्षात आलं की, एका कुख्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटनं भारतात कोकेनची तस्करी करण्याची योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे झांबियन नागरिक असलेल्या एल ए गिलमोर नावाच्या ड्रग्स सप्लायरची ओळख पटली. तसंच सततच्या तपासामुळं गिलमोर संदर्भात माहिती मिळाली अन् लवकरच तो मुंबईतील हॉटेलमध्ये राहण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
बॅगीत आढळले 2 किलो वजनाचे कोकेन : एनसीबी मुंबईच्या अधिकाऱ्यांची टीम मुंबईस्थित हॉटेलवर पाळत ठेवण्यासाठी तत्काळ नियुक्त करण्यात आली होती. 9 नोव्हेंबरला एल ए गिलमोर नावाच्या प्रवाशानं हॉटेलमध्ये चेक इन केल्याचं निश्चित झालं. थोड्या वेळानं, एल ए गिलमोरला रोखण्यात आलं. त्याची अंगझडती घेण्यात आली. सुरुवातीला, त्याच्या सामानातून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. परंतु कॅरीबॅगची बारकाईनं तपासणी केल्यावर बॅगच्या आतील थरांमध्ये ड्रग्स आढळून आली. थर कापून काढले असता, बॅगमधून एकूण 2 किलो वजनाचे कोकेन सापडले.
पुढील चौकशी सुरू : गिलमोर हा 9 नोव्हेंबरला विमानानं मुंबईत आला होता. चौकशी दरम्यान असं आढळून आलं की, गिलमोर याला एका हँडलरद्वारे माहिती दिली जात होती. त्याला सामानाच्या वितरणासाठी दिल्लीला येण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी एनसीबी-मुंबईच्या पथकानं तातडीने दिल्ली गाठली. त्यानुसार, ड्रग्स डिलेव्हरीसाठी निवडलेल्या क्षेत्रामध्ये पाळत ठेवून सापळा रचला गेला. शेवटी एम आर ऑगस्टिनो नावाच्या टांझानियन महिलेला 11 नोव्हेंबर रोजी दिल्लीत अटक करण्यात आली. या महिलेला गिलमोरकडून ड्रग्स मिळणार होता. दरम्यान, पुढील चौकशीसाठी दोघांना एनसीबी-मुंबईच्या ताब्यात घेण्यात आलंय.
हेही वाचा -