मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या आरोपाप्रकरणी आता खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संजय राऊत यांची गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जात असल्याचे वक्तव्य केले होते.
चौकशी होणार : संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राची गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची लवकरच मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली असून केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
सीएमच्या कार्यालयातून गुन्हेगारांशी संपर्क : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीच्या आधी बाहेर काढण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री कार्यालयातील या गोष्टींवर नजर ठेवली पाहिजे, म्हणजे त्यांना समजेल काय सुरू आहे ते असे देखील राऊत म्हणाले होते.
नाहीतर अडचणी वाढतील : संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याच्या चौकशीचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. आता संजय राऊत यांना या प्रकरणी लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. संजय राऊतांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत पुरावे द्यावेत. आम्ही कारवाई करू, अशी मुंबई पोलिसांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे दिले नाहीत तर या प्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -