मुंबई : ड्रग्ज विक्री करणाऱ्या लेडीज गँगला 3 ऑगस्टला गुन्हे शाखेच्या कक्ष 12 ने अटक केली आहे. गुन्हे शाखेचे कक्ष 12 चे एक पथक हे समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा त्यांच्या पथकाला कांदिवली पूर्वेकडे असलेल्या पोईसर बिहारी टेकडी परिसरात मातेश्वरी किराणा जनरल स्टोअर्सच्या बाजुला असलेल्या गल्लीमध्ये एक संशयित महिला आढळून आली. महिला पोलीस उपनिरीक्षक शेख या तिच्याकडे विचारणा करण्यासाठी गेल्या असता त्या महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने झटापट केली. त्यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सौम्य बळाचा वापर करून त्या महिलेस ताब्यात घेतले.
कुटुंबच ड्रग्ज सप्लायर : ताब्यात घेतलेल्या महिलेच्या घराची पंचांच्या उपस्थितीत झाडाझडती घेतली. तेव्हा तिच्याकडे 11 ग्रॅम वजनाचा 'मेफेड्रॉन' (एमडी) हा अमली पदार्थ सापडला. तसेच ती महिला राहत असलेल्या घरात त्यावेळी दोन महिला उपस्थित होत्या. या महिलांपैकी एक महिला ही ताब्यात घेतलेल्या महिलेची सून व दुसरी महिला ही तिची मुलगी होती. तेव्हा त्यांची महिला पोलीस अंमलदार यांनी झडती घेतली. त्यांच्याकडे 10 ग्रॅम वजनाचा 'मेफेड्रॉन' (एमडी) हा अमली पदार्थ मिळाला.
पंचांच्या उपस्थितीत रितसर पंचनामा : या तीन महिलांकडे एकूण 31 ग्रॅम वजनाचा 'मेफेड्रॉन' हा अमली पदार्थ सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 4 लाख 65 हजार इतकी आहे. प्रथम ताब्यात घेतलेल्या महिलेच्या घरात झडती दरम्यान एकूण 5 लाख 75 हजार 140 इतकी रोख रक्कम पोलिसांना आढळून आली. ही सर्व मालमत्ता पंचांच्या उपस्थितीत रितसर पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर तिन्ही महिला व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरता समता नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास समता नगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. कक्ष 12 च्या महिला पोलीस उपनिरीक्षक शेख आणि महिला पोलीस शिपाई जयश्री गोसावी यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा :