मुंबई - विमा कंपनीकडून येणे असलेली रक्कम जास्त फायद्यांसह मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका लेखापालाला(अकाऊंटट) कोट्यवधी रुपयांना फसवल्याची घटना समोर आली. पीडित लेखापालाची 3 कोटी 88 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना क्राईम ब्रँच युनिट-6 ने अटक केली. अटक केलेले आरोपी हे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य आहेत. त्यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यात शेकडो लोकांना करोडो रुपयांचा चुना लावला आहे.
मुलीच्या नावाने उघडली होती पॉलिसी -
या प्रकरणातील पीडित तक्रारदार राजेंद्र मंडविया यांनी त्यांच्या मुलीच्या नावाने 20 लाख 89 हजार रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. या पॉलिसीचा प्रीमियम हा वेगवेगळ्या टप्प्यात भरायचा होता. सरतेशेवटी प्रीमियम परवडत नसल्यामुळे त्यांनी ही पॉलिसी बंद केली होती. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना या पॉलीसीचे 18 लाख 2 हजार रुपये मिळाले होते. मात्र, उर्वरित 2 लाख 87 हजारांची रक्कम मिळायची बाकी होती. आरोपी व्यक्तींनी मंडविया यांच्याशी संपर्क साधून विमा कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. एनओसी, सीआयारडीसी चार्जेस, टीडीएस चार्जेस व वकील फीच्या नावाखाली मोठी रक्कम मिळवून देतो, असे सांगून त्यांना वेगवेगळ्या 48 बँक खात्यांमध्ये 3 कोटी 88 लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
अनेक राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल -
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे जम्मू-काश्मीर, बंगळुरू, आंध्रप्रदेश येथे दाखल असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी क्राईम ब्रँच युनिट-6ने प्रियदर्शी शांतीलाल गंभीर उर्फ कपिल (वय 36) राजेश कुमार दिपचंद कश्यप उर्फ सुनील मित्तल (वय 38), विनय कुमार राजेंद्र कुमार उर्फ राहुल गोयल (वय 30) व अजय त्रीलोकपुरी कश्यप उर्फ बॉस (वय 46) या आरोपींना उत्तर प्रदेश, नोएडा व दिल्लीतून अटक केली आहे.
एकाच व्यक्तीच्या फोटोवर 48 बनावट खाती -
जानेवारी 2015 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये पीडित तक्रारदाराने 48 बँक खात्यामध्ये तीन कोटींहून अधिक रक्कम टप्प्याटप्प्याने भरलेली होती. पोलिसांच्या तपासामध्ये सर्व बँक खाती दिल्ली, उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमध्ये ज्यावेळेस पीडित तक्रारदार पैसे भरत होता, ते पैसे तत्काळ काढून घेण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या संदर्भातील सर्व बँका खात्यांची कागदपत्रे मागवली असता त्यावरून एकाच व्यक्तीचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावाने बनावट कागदपत्र जमा करून ही बँक खाती उघडल्याचे समोर आले.
हेही वाचा - अमेरिकन डॉलर एक्सचेंज करण्याच्या नावाखाली २ लाखांचा गंडा; दोघांना अटक