मुंबई : या विश्वचषकात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या तिकडीनं कहर केला आहे. या तिघांचे चेंडू अक्षरश: आग ओकत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत अनेक नामवंत खेळाडू देणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशननं फास्ट बॉलर निवडीला सुरुवात केली आहे. मुंबईत गल्लोगल्ली, रस्त्यांवर तरुण मुलं क्रिकेट खेळताना दिसतात. मात्र सर्वांनाच पुढे खेळण्याची संधी मिळते असं नाही. आता अशा खेळाडूंना योग्य दिशा मिळावी यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करताना दिसत आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा पुढाकार : या संदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अभिषेक नायर यानं 'ईटीव्ही भारत'शी बातचीत केली. "इथल्या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. मात्र, त्यांना अनेकदा योग्य संधी आणि दिशा मिळत नाही. मुंबईत हजारो मुलं क्रिकेट खेळतात. त्यांच्यापैकी योग्य आणि प्रतिभाशाली खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे फास्ट बॉलर निवडीला आजपासून सुरुवात झाली आहे. मी देखील याच असोसिएशन मधून पुढे आलो आणि देशासाठी खेळलो. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाला वाटत असतं आपण एक ना एक दिवस आपल्या देशासाठी खेळावं. यासाठी अनेक मुलं प्रयत्न करत असतात. मात्र, तुमच्या खेळाला योग्य दिशा मिळण्याचं जे वय असतं त्या वयात मुलांवर अनेकदा जबाबदारी येऊन पडते. त्यांना अनेकदा मार्गदर्शन मिळत नाही. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं पुढाकार घेतला आहे", असं त्यानं सांगितलं.
भविष्यात देशाला एखादा मोहम्मद शमी मिळेल : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजिंक्य नायर यांनी देखील 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. "या संघटनेनं आतापर्यंत देशाला सचिन तेंडुलकर, कर्सन घावरी, बलविंदर सिंग संधू, धवल कुलकर्णी यांच्यासारखे अनेक खेळाडू दिलेत. यांच्यासारखे आणखी खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांनी भारतीय संघासाठी दर्जेदार खेळ दाखवावा, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन नेहमीच प्रयत्न करत असते. सध्या भारतीय संघात गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. मुंबईत देखील असे गोलंदाज तयार व्हावेत यासाठी आम्ही १६ ते २० वयोगटातील फास्ट बॉलर शोधण्यासाठी आजपासून निवड सुरू केलीये. आम्हाला आशा आहे या निवडीतून भविष्यात देशाला एखादा मोहम्मद शमी मिळेल", असं त्यांनी सांगितलं.
अंतिम सामना भारतच जिंकेल : रविवारचा अंतिम सामना भारतच जिंकेल अशी आशा असल्याचं ते म्हणाले. "ऑस्ट्रेलियाचा संघ देखील तितकाच तोडीचा असल्यानं भारतीय संघाला संयमानं खेळणं गरजेचं आहे. भारतीय संघानं आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केलीये. त्यामुळे आपण जेव्हा सोमवारी पहाटे उठू तेव्हा सर्वत्र 'इंडिया-इंडिया'च्या अशा घोषणा ऐकायला मिळतील", अशी प्रतिक्रिया अजिंक्य नायर व अभिषेक नायक यांनी व्यक्ती केली.
हेही वाचा :