मुंबई - 'सामना' या मुख्यपत्रातून संजय राऊत यांनी शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी केली असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानी केल्याबाबतचा खटला दाखल केला आहे. त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली असता, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच यासंदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अ नुसार तपास करण्याचे निर्देश देखील पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत.
राहुल शेवाळेंवर आरोप - राहुल शेवाळे हे सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. ते आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये होते. शिंदे गटात गेल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, 'सामना' वृत्तपत्रातून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. राहुल शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय असल्याचा आरोप करण्यात आला होता.
ठाकरे, राऊतांना समन्स - सामनामधून केलेले आरोप व्यक्तिशः राहुल शेवाळे यांची बदनामी करणारी आहे, असे म्हणत त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात याबाबत खटला दाखल केला आहे. त्या संदर्भातील कायदेशीर नोटीस देखील शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना बजावलेली आहे. त्यामुळे 14 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेले आहे.
काय आहे प्रकरण - राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये नमूद आहे की, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये 29 डिसेंबर 2022 च्या अंकामध्ये राहुल शेवाळे यांच्या संदर्भातील आरोप आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की दुबई आणि कराचीमध्ये बांधकाम व्यवसाय अर्थात रिअल इस्टेटमध्ये राहुल शेवाळे यांचा हितसंबंध आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत 3 जानेवारी 2023 रोजी नोटीस पाठवली होती. कोणत्या आधारावर या पद्धतीचा आरोप केला होता, असा सवाल देखील विचारला होता.
100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला - राहुल शेवाळे यांच्या प्रश्नाला 'सामना'च्यावतीने उत्तर देखील दिले होते. इंटरनेटवर या संदर्भात चर्चा करणाऱ्या एका महिलेकडून ही माहिती समजली आणि त्या माहितीच्या आधारावर हा लेख प्रकाशित केला होता, असे उत्तरात नमूद करण्यात आले होते. या उत्तराने समाधान न झाल्यामुळे राहुल शेवाळे यांनी त्यांचे वकील चित्रा साळुंखे यांच्यावतीने मुंबई दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली होती. तसेच शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा खटला देखील दाखल केला होता.
14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स - त्यासंदर्भात मंगळवारी मुंबई न्यायालयात सुनावणी झाली. राहुल शेवाळे यांच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला की, ज्यांनी एका पक्षासाठी काम केले त्यांच्यावर खोटे आरोप करणे हे नैतिकतेत बसत नाही. याचे परिणाम भोगावे लागेल. ज्या अर्थी पाकिस्तानमध्ये शेवाळे यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि त्या देशाशी संबंध आहेत असे आरोप करणे म्हणजे माझी बदनामी करणे आहे. राहुल शेवाळे यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
हेही वाचा -