मुंबई - शहर व उपनगरात गेल्या 24 तासात कोरोनाचे नव्याने 395 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 5,589 झाली असून आतापर्यंत 219 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईमधून आतापर्यंत 1,015 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाचे नव्याने 395 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 288 रुग्ण रविवार सायंकाळपासून आढळले तर 22 व 23 एप्रिलला खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले 107 जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 15 जणांचा मृत्यू झाला त्यात 10 जणांना दीर्घकालीन आजार होते. 15 मृत्यूपैकी 8 पुरुषांचा तर 7 महिलांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यात तिघांचे वय 40 च्या खाली आहे, 4 जणांचे वय 60 वर्षावर तर 8 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईमधील विविध रुग्णालयातून 108 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यापैकी 100 रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत. मुंबईमधून आतापर्यंत 1015 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
धारावीत 288 रुग्ण, 14 मृत्यू -
मुंबईमधील वरळी नंतर हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाचे 13 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 288 झाली असून आतापर्यंत धारावीतील 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.