मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू अझीम आझमी यांच्याशी वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची बदली झाली. हा व्हिडिओ समोर आल्याच्या एका दिवसानंतर शर्मा यांची बदली झाली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांचा प्रवासी कामगारांच्या प्रश्नावर आझमी यांच्यासोबत वाद झाला होता.
मध्य मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शर्मा यांची सायंकाळी उपनगरातील चेंबूर येथे बदली झाली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवताना पोलिसांकडून गैरप्रकार केल्याचा आरोप करत शर्मा यांची बदली व्हावी, या मागणीसाठी आझमी यांनी आंदोलन केले होते. या वेळी, आझमी आणि शर्मा यांच्यात वाद झाला होता. दोघांमध्ये शाब्दिक वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये अबू आझमी यांनी रात्री लोकांना जमवत, मुंबई महिला पोलिसांना उद्देशून, "ये औरत कहती है कि, आप पुलिस पे इल्जाम लगाते हो, मैं बात नहीं करूंगी। तेरे बाप के बाप के बाप को बात करनी पडेगी" असे म्हटले होते, असे या व्हिडिओत दिसत आहे. या प्रकारानंतर एका दिवसाने शर्मा यांनी बदली झाली आहे.
दरम्यान, शर्मा यांनी बदलीसाठी विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शर्मा यांच्यानंतर जय प्रकाश भोसले यांनी नागपाडा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे.
याआधी, अबू आझमी यांनी मंगळवारी मध्यरात्री नागपाडा येथे नियम भंग भडकाऊ भाषण, महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकी, मास्क न लावता पोलिसांशी अन्य नागरिकांच्या उपस्थितीत हुज्जत घालणे, असे प्रकार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी नागपाडा पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देत केली होती.