मुंबई - भाजप सरकार विरोधात ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. देशात उद्भवलेली आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, भाववाढ, बँकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती आणि देशातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती याला भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
देशातील सध्याची बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसने देशभर भाजप सरकारच्या विरोधात निर्दशने केले. याचाच भाग म्हणून ईशान्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रणिल नायर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - 'प्रिन्स'ची प्रकृती चिंताजनक; केईएम रुग्णालयाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोट बंदी करत देशातील काळा पैसा उघड होईल आणि देशातील पैशाचा काळाबाजार संपेल, असे म्हटले होते. मात्र, चार वर्षे झाली तरी नोटाबंदी करून काय साध्य झाले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले नाही. देशाबाहेर असलेला काळा पैसा आजही भारतात आलेला नाही. भाजपच्या काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत. देश आर्थिक मंदीत असून याला भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी केला.